जरांगेना न्यायाधीशांकडून ताकीद : कोर्टाचा अवमान होईल अशी टिप्पणी करू नका

दंड भरल्यानंतर अटक वॉरंट रद्द

पुणे : नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या खटल्यात गैरहजर राहिल्याने पुणे न्यायालयाने मराठा आंदोलक, मनोज जरांगे पाटील यांना अटक वॉरंट बजावले होते. मात्र जरांगे यांनी शुक्रवारी न्यायालयासमोर हजेरी लावली. त्यांनी कोर्टाने जप्त केलेल्या वैयक्तिक बंध पत्राची रक्कम भरल्यानंतर वॉरंट रद्द करण्याचा निर्णय प्रथम वर्गात न्याय दंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांनी दिला. त्यावर 3000 रुपयांच्या दंडानंतर जरांगे पाटील यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले. दरम्यान ‘न्यायालयाचा अपमान होईल. अशी वक्तवे टाळा.’ अशा कडक शब्दात न्यायालयाने जरांगे यांना ताकीदही दिली. जरांगे यांचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर यावेळी म्हणाले, जरांगे यांच्यावर संभाजीनगरला मूत्रपिंड व पचनक्रियसंबंधी उपचार सुरू आहे. शुक्रवारी जरांगे रुग्णवाहिकेतूनच न्यायालयात आले होते. कोर्टाने हजर राहण्याचे समस बजावले. तेव्हा जरांगे उपोषणाला बसले होते, त्यामुळे ते हजर राहू शकले नाही. न्यायालयाचा अपमान करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. यावर न्यायालयाने म्हटले की, ‘जरांगे यांनी कोर्टाबाबत केलेले आक्षेपार्ह विधान योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अपमान होईल. अशी टिप्पणी करणे आपण टाळावे म्हणजे अपमान कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.जरांगे त्यांच्या वक्तव्यावर कारवाईचा अधिकार न्यायालयाला आहे. त्यांच्या टिप्पणीने आमच्यावर काहीच प्रभाव पडणार नाहीत. जरांगे यांनी यापुढे अशी टिप्पणी करताना दक्षता बाळगावी.’ अशी ताकीद जरांगेना न्यायाधीशांकडून देण्यात आली’