श्रावणी सोमवारपासून शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन

जलाभिषेक मोफत

कुकाणे : शनिशिंगणापूर येथील शनिदेव चौथा जन्मदराचे काम पूर्णत्वास गेले असून जगभरातील शनी भक्तांचे आकर्षण असलेला चौथरा येत्या श्रावण सोमवारपासून भक्तांच्या दृष्टीस पडणार आहे. शनि भक्तांच्या साठ लाख रुपयांच्या दानातून हा घडीव चौथारा शनी शिंगणापूरला साकारला आहे. तामिळनाडूतून, कांचीपुरम व सेलम येथून आणलेल्या दगडांवर कर्नाटकातील हुबळीला कोरीव काम करण्यात आले. आणि त्यानंतर शनी शिंगणापूर येथे आणून झळाळी देण्यात आली. गेल्या जुलै महिन्यात कोरीव काम असलेले शिल्प कर्नाटकातील कारागीरांकडून बसवण्याचे काम सुरू होते. त्यावर अंतिम झळाळीचा हात फिरवून ते काम आता पूर्णत्वास गेले आहे. शनि भक्तांना चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्यास येत्या सोमवारपासून मुभा मिळणार आहे. नव्या कामासाठी शनी भक्तांना चौथर्‍यावरचे दर्शन थांबवण्यात आलं होतं. येत्या श्रावणातला जलाभिषेक मोफत असून दैनंदिन असणारा तैलाभिषेक मात्र पेड आहे. चौथर्‍याच्या पायऱ्या सिंहव्याली असून गजपट्टीकेत कोरलेले हत्ती दिसत आहेत. या सर्व कामाला चार महिन्यांचा कालावधी लागला. शनि भक्तांचे दान आणि देवस्थानच्या माध्यमातून हे काम करण्यात आले असून ते शनिशिंगणापूरच्या शिल्पकलेत भर घालून देवस्थानचे वैभव वाढवणारे आहे.