निवडणूक लढणार नाही : जरांगे पाटील

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन दिवसांपासून जरांगे पाटील निवडणुकीत समीकरण कसे जुळतील, उमेदवार, मतदार संघ निवडणे या करीता प्रयत्न करीत होते. रविवारी जरांगे यांनी उपस्थित इच्छुक उमेदवार व नागरिक यांच्याशी चर्चा केली. १५ ते २० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली होती. अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस व कमी वेळ शिल्लक राहिल्याने व मित्र पक्षाकडून यादी वेळेत न आल्याने जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय जाहीर केला. या वेळी जरांगे म्हणाले, की रविवारी रात्री मतदार संघांची चाचपणी केली. मित्र पक्षाकडून सकाळपर्यंत यादी आली नाही. आमची जवळपास २५ मतदार संघांबाबत चर्चा झाली. काही मतदार संघांचा विषय प्रलंबित होता. एका जातीवर निवडून लढवणे शक्य नव्हते. अर्ज माघारी घेण्याची सोमवारी शेवटची तारीख होती, त्यामुळे वेळ कमी मिळाला. त्यामुळे सर्वांना विचारून विधानसभेत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जरांगे यांनी या वेळी जाहीर केले. आपला राजकारण हा खानदानी धंदा नाही. राज्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांनी ते काढून घेण्याचे आवाहन जरांगे यांनी या वेळी केले. विधानसभा निवडणूक संपली कि आपले आरक्षण बाबतचे आंदोलन सुरू होणार आहे. ही निवडणूक आपल्याला लढायची नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला, त्रास दिला त्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकवेल. लोकांनी कोणाला पाडायचे व कोणाला निवडून आणायचे हे ठरवावे. मतदार संघ ठरवले होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, की उमेदवारांचे नाव घोषित करावयाचे होते. माघार घ्यायचे असते तर ही प्रक्रिया केली नसती. एका जातीवर निवडणूक लढणे शक्य नव्हते. मित्र पक्षाची यादी लवकर मिळाली नाही. म्हणून उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाला अडचणीत आणायचे नाही, गनिमी कावा करून समोरच्यांना धडा शिकवला जाणार आहे. ज्यांना निवडून आणायचे त्यांच्याकडून समाजाने लेखी घ्यावे. मी कोणाला पाडा म्हणत नाही व निवडून आणा म्हणत नाही. तो निर्णय समाज घेणार आहे. लोकसभा निवडणूक प्रमाणे कार्यक्रम होणार. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, असेही जरांगे यांनी सांगितले.