आमच्या फॅक्टरची ताकद एका महिनाभरात कळेल; मनोज जरांगे पाटील

“मी आणि माझा समाज विधानसभेच्या निवडणुकीत नव्हतो. तरीही आमचा फॅक्टर चालला नाही, अशी चर्चा होताना दिसते. आमच्या फॅक्टरची ताकद एका महिनाभरात कळेल,” असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे रविवारी (ता. २४) बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला होता. मात्र, समीकरण न जमल्याने त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर ‘जरांगे फॅक्टर चालला नाही’, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली. त्यावर जरांगे म्हणाले, “उमेदवार उभे करण्यासंदर्भात आमचे समीकरण जुळले नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीत उतरलो नाही. या निवडणुकीत समाज बंधनमुक्त होता. त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले. कोण निवडून आले, कोण हरले याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. महायुतीने गोड बोलून मराठा समाजाची मते घेतली. मराठा समाजाच्या सहभागाशिवाय सरकार येणे शक्य नाही. तुमचे उमेदवार पुन्हा निवडून आले आहेत, सरकारही तुमचे येणार आहे. आता आरक्षणाचा निर्णय लवकर घेण्याची जबाबदारी नव्या सरकारची असेल.’