पुणे:
देव – देवी नवसाला पावावी म्हणून महाराष्ट्रात जागरण – गोंधळ केलं जात. मात्र झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने जागरण आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील अपंग कल्याण आयुक्तालयासमोर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पक्षिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांनी जागरण आंदोलन केलं.
28 डिसेंबर 2016 ला दिव्यांग हक्क कायदा पारित करण्यात आला होता. मात्र 4 वर्ष लोटूनही प्रशासन दिव्यांग हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने दिव्यांग बांधवांना त्यांच्या मूलभूत अधिकारा पासून वंचित राहावं लागत. त्यामुळे दिव्यांग हक्क कायदा 2016 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, 21 प्रवर्गातील दिव्यांगाना एकाच रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावं, शासकीय नोकरतील दिव्यांग आरक्षणाचा कोटा पूर्णपणे भरण्यात यावा आणि अपंग वित्त विकास महामंडळाला केंद्राने आणि राज्याने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.