‘मुळा’ धरणावर पाण्याची ७५ टक्के हजेरी

२०२३ च्या तुलनेने यंदा अधिक पाणीसाठा

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश पर्जन्यवृष्टी सुरू आहे. रविवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत पाणीसाठ्यात १ हजार ३८७ दशलक्ष घनफूट वाढ झाली. या हंगामातील ही २४ तासातील सर्वाधिक वाढ आहे. धरणाकडे कोतुळ येथून ३० हजार १२५ क्युसेक आवक सुरू आहे. धरणात १९ हजार ७३५ दशलक्ष घनफूट (७५ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.

रविवारी सायंकाळी धरण ७५ टक्के भरले. दुपारी धरण पाणलोट क्षेत्रातून मुळा धरणाकडे तब्बल ४१ हजार ६०० क्युसेकने पाण्याची आवेक होत आहे. या हंगामातील ही सर्वाधिक आवक होती. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात व कोतुळकडील मुळा नदीला महापूर आला आहे. धरणपातळी नियंत्रित करण्यासाठी, तसेच पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाचा पूर नियंत्रण कक्ष स्थितीकडे लक्ष देण्यासाठी सज्ज झाला आहे. मुळा धरणाच्या पाणलोटात दोन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. शनिवारी मुळा धरणाकडे २० हजार क्युसेकने होणारी पाण्याची आवक रविवारी वाढली.

२०२३ च्या तुलनेने यंदा अधिक पाणीसाठा

* गेल्या काही वर्षात ही सर्वाधिक विक्रमी आवक मानली जात असून सायंकाळी सहा वाजता आवक ३० हजार क्युसेकपर्यंत कमी झाली आहे.

* धरणात गतवर्षी आजच्या वेळेस १८हजार ५९४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत ८४१ दशलक्ष घनफूट अधिक आहे.

* कोतुळकडील मुळा नदीला सहा मीटरने तब्बल ४१ हजार ६०० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.