घरोघरी मनपाची जनजागृती, साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन
अहमदनगर : दर रविवारी एक तास स्वच्छतेसाठी द्या, पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार होण्यापासून स्वताःला लांब ठेवा, असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले असुन, त्यास अहमदनगर शहर व उपनगरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या रविवारी मनपाच्या वतीने नालेगाव परिसरात झिका, डेंग्यू आदी विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात आयुक्त डांगे यांनी स्वतः सहभागी होऊन नागरिकांना डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट करण्याचे आवाहन केले. घर, परिसराजवळ कोणत्याही ठिकाणी साचलेले पाणी वाहते करून द्यावे, फ्रिजचे ट्रे, कुंड्या, पक्ष्यांसाठी ठेवलेले पाण्याचे भांडे, जुने टायर, भंगार वस्तू यामध्ये साचलेल्या पाण्यात एडिस डासांची उत्पत्ती होऊन विषाणूजन्य आजार पसरतात. त्यामुळे सदरचे पाणी तत्काळ वाहते करावे, संतुलित आहार घ्यावा, लहान मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन डांगे यांनी केले.
यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे, विकास गीते, सतीश ताठे आदींसह महात्मा फुले आरोग्य केंद्राचे डॉक्टर, कर्मचारी अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होत्या. यावेळी कवडे म्हणाले, पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. औषध व धूर फवारणीचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित असून, त्यांनी देखील प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन यावेळी केले.
* प्रत्येकदारी मनपाची जनजागृती
मनपाच्या वतीने शहरात डेंग्यूमुक्त शहर अभियानानिमित्त जनजागृती मोहीम सुरू आहे. यानिमित्त कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन माहिती देत तपासणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त यशवंत डांगे भर सकाळी नगर शहरामध्ये स्वच्छतेची माहिती घेत कर्मचाऱ्यांबरोबर डेंग्यूसंदर्भात जनजागृती करत आहे.