अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी!
अहमदनगर : वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन झाले आहे. रविवारी व सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर मघा नक्षत्रातील सरी कोसळल्या. राहुरी, संगमनेर, नगर शहर, तालुका, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. खरिपातील पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा, आढळा ही धरणे भरली असून, मुळा, निळवंडे धरणे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. दरम्यान, गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे. नगर शहरात रविवारी रात्री, तसेच सोमवारी दुपारी दीड तास जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणी पाणी झाले.