आला थर्टी फर्स्ट, प्रशासन अलर्ट; आठ पथकांद्वारे घालणार गस्त

अहिल्यानगर – फर्स्टच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दारू आणि मटण पार्ट्याचं बेत आखले जात आहेत. काही ठिकाणी रंगीत-संगीत पार्ट्याही केल्या जातात. वर्षाअखेरीस बनावट दारूचा वापर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाला आहे. अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी आठ पथके तैनात केली आहेत. त्यांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे. जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागतासाठी थर्टी फर्स्ट (३१ डिसेंबर) सेलिब्रेशन केले जाते. खास करून तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पार्ट्याचं बेत आखले जाते. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल्स, लॉन, तसेच फार्म हाऊस अशा ठिकाणी पार्ट्याचं नियोजन केले जाते. त्यात दारूचा वापर होतो. परंतु ती दारू बनावट दारू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बनावट दारूची विक्री होणार नाही याकडे लक्ष देण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असते. येथील अधीक्षक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी आठ पथके नियुक्त केली गेली आहेत. त्यांच्याकडून थर्टी फर्स्ट व नाताळ सणाच्या अनुषंगाने कारवाई सुरू केली आहे. नाताळ व थर्टी फर्स्टच्या दिवशी मद्य पार्टीचे आयोजन केलेल्या ठिकाणी एक दिवसीय परवान्याशिवाय मद्य वितरण चालू असल्यास तेथे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. किरकोळ व ठोक मद्य विक्रेत्यांच्या दुकानात सीसीटीव्हीची नजर असेल.