नगरमध्ये ओबीसी समाजीची बैठक संपन्न
अहमदनगर : गावाखेड्यांमधील ओबीसी समाज, भटका विमुक्त समाज, वंजारा समाज, घिसाडी, लोहार, सुतार आजही वंचित आहे. निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत मध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. कायदा ज्या सभागृहात तयार होतो, त्या सभागृहात ओबीसींचे प्रतिनिधी नसल्याने ओबीसींवर अन्याय होत आहे. जोपर्यंत आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार नाही. तोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. प्रत्येक पक्ष म्हणतो, ओबीसीला धक्का लावणार नाही. परंतु ओबीसीचे कुणबी दाखले मागच्या दाराने देऊन ओबीसींवर अन्याय होत आहे, असे मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
नगर येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात भटक्या विमुक्त सकल ओबीसी समाजाच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ओबीसी व्हिजेएनटी जन मोर्चाचेचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, अण्णा शेलार, सुधाकर आव्हाड, बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, बंडू भुकन, दादाभाऊ चितळकर, आदींसह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री हाके पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी उमेदवार देण्याची तयारी होत आहे. येणाऱ्या निवडणुकीत नगर जिल्ह्याने मागे राहू नये. ओबीसींचे आमदार होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ६५ टक्के लोकसंख्या ओबीसींची आहे. नगर जिल्ह्यातील एकाही आमदाराने ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी समाजाला पाठिंब्याचे दोन ओळीचे पत्र देखील दिलेले नाही. त्यांना येणाऱ्या विधानसभेत ओबीसी समाज जागा दाखवून देईल. ओबीसी ने जागे व्हा. ओबीसी समाजाने ओबीसी उमेदवारांनाच मते द्यावीत. ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून आपली ताकद दाखवून देईल. तसेच ओबीसींच्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी लढा उभारणार असल्याचे असे प्रतिपादन मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले आहे.