ओडिशावर संकट; आज रात्री ओडिशात धडकणार ‘दाना’ चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरातून उठलेले चक्रीवादळ ‘दाना’ने वेग घेतला आहे. भारतीय हवामान विभागानुसार ते ताशी १८ किमी वेगाने ओडिशा किनारपट्टीकडे सरकत आहे. बुधवारी सायंकाळी ते पारादीपपासून ४६० किमी, तर सागर बेटापासून ५०० किमी दूर होते. दाना २४ ऑक्टोबरच्या पहाटे सुमारे २ वाजता भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ धडकेल. भुवनेश्वर हवामान केंद्रानुसार, हे वादळ ताशी १२० किमी वेगाने ओडिशाच्या उत्तर भागातून जाईल. याच्या विळख्यात १४ जिल्हे आहेत. वादळाचा संभाव्य परिणाम पाहता पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर यांनी भाविकांना आवाहन केले की, त्यांनी २४ आणि २५ ऑक्टोबरला जगन्नाथ मंदिरात जाऊ नये. महाप्रभूचे दर्शन मिळणार नाही. कार्तिक मासासाठी मंदिर परिसराच्या आसपास थांबलेल्या विधवा महिलाही दर्शन घेऊ शकणार नाहीत. दोन दिवसांसाठी कोणार्कचे सूर्यमंदिरही बंद केले आहे.