मतदार जागृतीसाठी निशुल्क ऑनलाईन निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन
शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (संस्कृती रासने )
मतदार जागृतीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन, निवडणुक विभाग, नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय व महाविद्यालयीन गटासाठी ही स्पर्धा निशुल्क घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे व डोंगरे संस्था तथा वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी केले.
लोकशाही सदृढ व बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढण्याची गरज आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्यास सक्षम उमेदवार निवडून येऊन विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी नागरिकांसह युवकांमध्ये मतदार जागृती करण्याची आवश्यकता आहे. या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून मतदार जागृती अभियानातंर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी दिली.
हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा
निबंध व पोस्टर स्पर्धा ऑनलाईन होणार आहे. दोन्ही स्पर्धा लहान गट (इयत्ता 8 वी ते 10 वी) व मोठा महाविद्यालयीन गटात होणार आहे. निबंध स्पर्धेसाठी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व, मतदान राष्ट्रीय कर्तव्य, मतदार राजा व राजकीय पक्ष आणि निवडणुकांची आजची स्थिती हे चार विषय देण्यात आले आहे. तर पोस्टर स्पर्धेसाठी आपल्या कल्पनाशक्तीने मतदार जागृती दर्शविणारे पोस्टर घोषवाक्यासह चित्राने साकारायचे आहे. दोन्ही स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी दि.12 ऑगस्ट पर्यंत आपल्या प्रवेशिका पीडीएफ करुन 9226735346 या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करायच्या आहेत. प्रवेशिका पाठविताना स्पर्धकाचे पासपोर्ट फोटो, नांव, पत्ता, शाळा किंवा महाविद्यालयाचे नांव व इयत्ता याबद्दल माहिती पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाच्या सचिव प्रतिभा डोंगरे, गौतम फलके, अक्षय ठाणगे, ऋषीकेश बोडखे आदी परिश्रम घेत आहे.