श्री क्षेत्र मेहेकरी इथे अखंड हरिनाम सप्ताह भंडारा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला!

अहिल्यानगर : तालुक्यातील श्री क्षेत्र मेहेकरी इथे अखंड हरिनाम सप्ताह भंडारा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. नगर पाथर्डी रोडवर श्री सद्गगुरू नाथांच्या मठात ग्रामस्थ आणि पंच क्रोशितील भाविकांची अलोट गर्दी झाली होती. ग्रामस्थ मोठ्या सेवा भावी वृत्तीने या सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करतात. श्री सद्गुगुरू नाथांच्या कृपेने, श्रीसंत वैकुंठवासी परमपूज्य नामदेव बाबा आणि श्री संत खुशाल भारती महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच श्री क्षेत्र सद्गुगुरू मठाचे अध्यक्ष हरी भक्त परायण लक्ष्मण महाराज आणि सेवेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याची सांगता महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. कल्याची दहीहंडी महाराजांनी राम कृष्ण हरीचा गजर करीत फोडली. लवकरच या मठाचा जीर्णोद्धार करायचा असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . त्यांची तारीख मिळवण्याची विनंती आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी कॅबिनेट मंत्री मुंडे बंधू भगिनी यांना बोलावण्यात येणार असल्याचे सांगताच ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे एपिआय गीते,सुधीर पोटे, उद्धवराव गीते, काशिनाथ आव्हाड, शरद बडे, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. एपीआय गीते यांनी आपल्या मनोगतात मठाच्या जीर्णोद्धार करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. किर्तनानंतर आमटी भाकरीचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला. दिनांक 16 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या सप्ताह काळात दररोज सकाळी काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण तुकाराम गाथा भजन, आणि दररोज रात्री हरिकिर्तन असे कार्यक्रम पार पडले.