पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..आमदार लंकेंकडे बोट
पारनेर लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे.
ऋषिकेश राऊत
अहमदनगर
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते.
आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. कोवीड लसीकरणावरुन आमदार निलेश लंके यांनी एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याचा उल्लेखही देवरे यांनी लंके यांचे नाव न घेता केला आहे.
त्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये त्या म्हणाल्या आहेत की, महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा असे सविस्तर कथन त्यांनी या क्लीपमध्ये केले आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही ऐकू येतात. हीच आपली सुसाईट नोट समजावी, असेही त्या म्हणत आहेत. तर कधी धीराने लढण्याची शिकवण असल्याचे सांगत आहेत.
आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून सदर पत्र लिहिलं गेलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘दीपाली तू हे कृत्य केल्याचे मला तेव्हा आवडले नव्हते. पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटत आहे. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात.
लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची? दीडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
आता एकदाची निघून जावे वाटते सुसाईट नोटमध्ये यांची सर्वांची नावे लिहून ठेवावीत. पण पुन्हा वाटते की अरे ती सुसाईट नोट कोर्टाने खोटी ठरविली तर? मग हिरा बनसोडे सारखे फिर्याद कोणाकडे द्यायची? कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्या मागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे. माझ्यासारखी एक महिला अधिकारी विझली तर राज्यातील सर्व पुरूष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महिला अधिकाऱ्यांना घाबरून वागतील. किंवा इतर अधिकारी ज्योतीसारखे फार धाडसाने वागू नये म्हणतील. साईड पोस्ट मागतील किंवा नोकरीच सोडतील, असे हुंदके देत त्यांनी म्हटले आहे. अजूनही बराच उल्लेख या क्लिप मध्ये आहे.