पीपल्स हेल्पलाईन चे गुरुवारी “लोककर्क विरोधी राष्ट्रीय आंदोलन”
पंपिंग स्टेशन ते प्रेमदान चौक झाला "कॅन्सर मोबाईल टॉवर मार्ग"
अहमदनगर (वैष्णवी घोडके)
नगर शहरात धर्माधिकारी मळा येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन टाळेबंदीत बंद पाडलेले फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम पुन्हा महापालिकेच्या परवानगीने सुरु झाल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने लोककर्क विरोधी सत्याग्रह जारी करण्यात आले आहे. आज पंपिंग स्टेशन ते प्रेमदान चौक रस्त्याचे नामांतर “कॅन्सर मोबाईल टॉवर मार्ग” करण्यात आले असल्याची माहिती ऍड. कारभारी गवळी यांनी दिली.
एप्रिलमध्ये टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भितीने स्थानिक नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध दर्शवून रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्याने महापालिका प्रशासनाने हे काम तात्पुरत्या स्वरुपात बंद पाडले. मात्र संबंधित जागा मालकाने महापालिकेकडून परवानगी घेऊन पुन्हा टॉवर उभारणीचे काम सुरु केले आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे पाचशे मीटर अंतरावरील नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने स्थानिक नागरिकांचा या टॉवरल विरोध आहे. मोबाईल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भाडे मिळणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता टॉवर उभारले जात आहे. महापालिका प्रशासनाचे अधिकारी आर्थिक हितासाठी लोकवस्तीमध्ये अशा टॉवरला परवानगी देत असल्याचा आरोप ऍड. कारभारी गवळी यांनी केलाय. महापालिकेने लोकवस्ती मध्ये उभे राहत असलेल्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरची दिलेली परवानगी रद्द करुन सदर काम थांबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलीय.
महापालिका प्रशासनाचा अंधाधुंदी कारभार सुरु असून, पैसे घेऊन सर्व नियम धाब्यावर बसविण्याचे प्रकार सुरु आहे. जागा मालक टॉवर उभारुन पैश्याचा झाड लावत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सरला बळी पडावे लागणार आहे. दाट लोकवस्तीमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास महापालिका प्रशासन कोणत्या नियमाने परवानगी देत आहे? तातडीने टॉवरचे काम थाबवावे. अन्यथा सर्वसामान्य नागरिक आक्रमकपणे आंदोलन उभारणार असल्याचे ऍड. गवळी म्हणाले. या आंदोलनासाठी माधवी दांगट, प्रकाश हजारे, डॉ. अनिल बोरा, अभय मेहेत्रे, ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, गोरक्षनाथ दांगट आदी प्रयत्नशील आहेत