फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू
युद्धाचं रिपोर्टींग करताना गोळीबारात जखमी
अफगाणिस्तानात पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर भारताचे वरिष्ठ फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानचं लष्कर आणि तालिबानींच्या संघर्षात मृत्यू झाला आहे.
दानिश सिद्दीकी हे रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. रॉयटर्सनं त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संघर्षादरम्यान अफगाणिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचंही अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे.अफगाणिस्तानच्या विशेष सुरक्षा दलाची एक तुकडी स्पिन बोल्डक शहरातील बाजारावर पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तालिबानींबरोबर चकमक झाली आणि त्यात दानिश यांच्यासह अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं, अफगाणिस्तानच्या कमांडरनं रॉयटर्सला सांगितलं. दानिश आठवडाभरापासून अफगाणिस्तानच्या विशेष दलासह कंधहार प्रांतात होते. त्याठिकाणाहून ते अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यातील संघर्षाच्या बातम्या पाठवत होते, अशी माहिती रॉयटर्सनं दिली आहे. रॉयटर्सचे प्रमुख मायकल फ्रिडेनबर्ग आणि मुख्य संपादक अॅलेसँड्रा गॅलोनी यांनी याबाबत अधिक माहिती मिळवत असून, या भागातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. अद्याप भारत सरकारकडून दानिश यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया आलेली नाही.
“रॉयटर्सची प्रतिक्रिया”
“दानिश अत्यंत हुशार पत्रकार होते. त्याचबरोबर ते उत्तम पती, पिता आणि सहकाऱ्यांमध्ये आवडते होते. या अत्यंत दुर्दैवी काळात त्यांच्या कुटुंबाबरोबर आमच्या संवेदना आहेत,” असं फ्रिडेनबर्ग आणि गॅलोनी म्हणाले. “युद्धाचं रिपोर्टींग करताना गोळीबारात ते जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. स्पिन बोल्डकमध्ये तालिबान मागं हटलं त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि तेव्हा त्यांची तब्येत ठिक होती,” असं रॉयटर्सनं म्हटलं आहे. त्यापूर्वी भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुन्दजई यांनी दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. “काल रात्री कंधहारमध्ये माझा मित्र दानिश सिद्दीकीच्या मृत्यूच्या वृत्तानं वेदना झाल्या. पुलित्झर प्राप्त भारतीय पत्रकार दानिश अफगाणिस्तानच्या लष्कराबरोबर होते. मी दोन आठवड्यांपूर्वी त्यांना भेटलो होतो. तेव्हा ते काबूलला चालले होते. त्यांचं कुटुंब आणि रॉयटर्सप्रतीही माझ्या संवेदना आहेत,” असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. टोलो न्यूज या अफगाणिस्तानच्या टीव्ही चॅनलच्या मते दानिश यांचा मृत्यू कंधहारच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यातील संघर्षाचं वृत्तांकन करताना झाला. तालिबानं बुधवारी स्पिन बोल्डक शहर आणि त्याठिकाणी पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील एका महत्त्वाच्या चौकीवर ताबा मिळवला होता.
“2018 मध्ये मिळाला होता पुलित्झर पुरस्कार”
दानिश सिद्दीकी हे रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेचे मुख्य फोटोग्राफर होते. काही दिवसांपासून ते अफगाणिस्तानात सुरू असलेल्या संघर्षाचं वृत्तांकन करत होते. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्या काही दिवसांत सातत्यानं त्याठिकाणच्या स्थितीची माहिती दिली होती. एका हल्ल्यातून बालंबाल बचावल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दानिश सिद्दीकी सध्या मुंबईत स्थायिक होते. याठिकाणी ते भारतातील रॉयटर्स पिक्चर्सच्या मल्टीमीडिया टीमचे प्रमुख होते. रोहिंग्या निर्वासितांच्या संकटाच्या वृत्तांकनासाठी केलेल्या फीचर फोटोग्राफी श्रेणीत त्यांना 2018 मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्यांनी अफगाणिस्तान आणि इराकच्या युद्धाशिवाय कोरोनाची साथ, नेपाळचा भूकंप आणि हाँग-काँगमधील आंदोलनाचं वृत्तांकनही केलं होतं. त्यांनी दिल्लीमध्ये जामिया मिलिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली होती. 2007 मध्ये त्यांनी जामियाच्या एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून जनसंपर्क विषयांत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती. पत्रकारितेतील सुरुवात त्यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रतिनिधी म्हणून केली होती. नंतर ते फोटो जर्नालिस्ट बनले. 2010 मध्ये त्यांनी रॉयटर्समध्ये इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली होती.
“सरकारला विनंती”
“दानिश सिद्दीकी त्यांच्या पाठिमागं मोठ्या यशाचा वारसा सोडून गेले आहेत. त्यांनी फोटोग्राफीसाठी पुलित्झर पुरस्कार मिळवला होता. कंदहारमध्ये ते अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांबरोबर काम करत होते. त्यांचा एक फोटो शेअर करतोय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” अशी पोस्ट माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. कांग्रेस नेते राहुल गांधींनीही दानिश यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. “दानिश यांच्या कुटुंब आणि मित्र परिवाराप्रती माझ्या संवेदना आहे. भारत सरकारनं शक्य तेवढ्या लवकर त्यांचं पार्थिव घरी आणावं, अशी विनंती आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही दानिश सिद्दीकींच्या निधनावर शोक प्रकट केला आहे. “दानिश यांच्या अकाली निधनाचं दुःख आहे. त्यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून साथींमुळं होणारं नुकसान, सामुहिक हत्या आणि मानवी संकटं आपल्यासमोर मांडली होती. कोणत्याही प्रकारची हिंसा आणि कट्टरतावाद यांचा खात्मा करायलाच हवा, हा संदेश पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूमुळं जगाला मिळाला,” असंही ते म्हणाले. “आपल्या भावना दृश्यांवर जास्तीत जास्त अवलंबून असलेल्या काळात त्यांनी संवेदनशीलता, विषयाची प्रतिष्ठा आणि सौदर्यदृष्टीच्या माध्यमातून आपल्या मनाचा ताबा घेणारी छायाचित्रं टिपली होती. दानिश, आमचा काळ फोटोंमध्ये दाखवण्यासाठी आपले आभार. हे फोटो कायम जिवंत राहतील. ईश्वर आपल्या आत्म्याला शांती देवो,” असं कॉमेडी आर्टिस्ट कुणाल कामरा यांनी म्हटलं.