७ वेळा नावात लबाडी करूनही, डॉ. पूजा खेडकरने दिली परीक्षा!
खेडकर मॅडमचे उद्योग पोलिस तपासात उघडले
वादग्रस्त बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकरने अनके कारनामे केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. पूजा हिने एकूण १२ वेळा युपीएससी परीक्षा देताना तिच्या नावात बदल केलाच पण सोबतच पालकांच्या नावातदेखील बदल करून तब्बल ७ वेळा परीक्षा दिल्याचे परक्रम उघडकीस आले आहे. स्वतःचे आणि पालकांच्या नावाचे इंग्रजी भाषेतील स्पेलिंगमध्ये बदल करून तिने वेळोवेळी परीक्षा दिल्याचे, दिल्ली पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.पूजा खेडकर हिचे आयएएस पद यूपीएससीने रद्द केल्यानंतर तिच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने तिला कधीही अटक होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सन २०१२ पूजा खेडकरने यूपीएससीची पहिल्यांदा परीक्षा देताना स्वतःचे नाव ‘खेडकर पूजा दिलीपराव’ असे सांगितले. त्यानंतर सन २०१८ मध्ये दुसऱ्यांदा तिने नावात बदल करून ‘पूजा दिलीप खेडकर’ असा उल्लेख करत आईचे नाव ‘बुधवंत मनोरमा जगन्नाथ’ असे सांगितले. २०२२ च्या परीक्षेत ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ असे नाव सांगून वडिलांचे नाव ‘दिलीप के खेडकर’ व आईचे नाव ‘मनोरमा जे बुधवंत’ असे नावात बदल पूजाने केले.
‘खेड़कर पूजा दिलीपराव’ असा २०१९ च्या अर्जात केला उल्लेख’
२०१९ मध्ये ‘खेडकर पूजा दिलीपराव’ असे नाव करून दृष्टिदोष दिव्यांग असल्याचे यूपीएससीच्या अर्जात सांगितले. पुन्हा सन २०२० मध्ये तिने ‘खेडकर पूजा दिलीपराव’ असे नाव परीक्षेस देताना वडिलांचे नाव ‘खेडकर दिलीपराव के’ असा बदल केला. तर आईचे नाव ‘बुधवंत मनोरमा जे’ असा बदल केला. तर २०२१ च्या परीक्षेत ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ असा बदल करुन वडिलांचे नाव दिलीप खेडकर तर आईचे नाव मनोरमा बुधवंत असे सांगितले. सतत नावामध्ये बदल करून पूजा खेडकरने नेमके किती वेळा परीक्षा दिली हे यूपीएससीलादेखील शोधता आले नाही. ओबीसी दिव्यांग प्रवर्गातून नऊ वेळा परीक्षा देण्याची तिची मर्यादा सन २०२० मध्ये संपुष्टात आली होती. मात्र, त्यानंतरदेखील तिने जाणीवपूर्वक नावात बदल करुन सीएसई २०२१, २०२२, २०२३ ची यूपीएससी परीक्षा दिली असल्याचे निष्पन्न झाले.
अखेर ‘मनोरमा खेडकर’ हिला जामीन मंजूर
पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्य दाखल झाला असून, सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. मनोरमाची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिनावर सुटका करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत तपास अधिकाऱ्याने नोटीस दिल्याशिवाय पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करू नये, तसेच तक्रारदार व साक्षीदारांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये, तपास यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावे त्यासोबतच तपास अधिकाऱ्यांना आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना कळवल्याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही, अशा नियमअटी बजावल्या.