पुणे जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून अनेक नामांकित पर्यटन स्थळे पुणे शहराच्या आजूबाजूला तसेच जिल्ह्यात आहेत. लोणावळा परिसरातील भुशी धबधब्यात पाच जण वाहून जात मृत झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांची कोंडी करत भीमाशंकर, लोणावळा, सिंहगड परिसरात पर्यटकांच्या पर्यटनावर बंदी किंवा नियम घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता पावसाळ्यात किंवा सुट्टीत नेमके फिरावयास जायचे कुठे? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा या आठ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, प्रशासनाच्या कठोर निर्णयावर पर्यटक मात्र नाराज झाले आहेत. कारण पुणे जिल्ह्यातील धबधबे, धरणगड, किल्ले, तलाव या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू झाल्याने या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. आदेशाचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. नुकत्याच लोणावळ्यातील भुशी धबधबा आणि मुळशीतील तामिळी परिसरात दुर्घटना घडल्या. त्यामुळे प्रशासनातर्फे धोकादायक धबधबे, तलाव,दरी, धरण जागी पाण्यात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Prev Post