झिकाचे राज्यात आठ रुग्ण आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी

गरोदर महिलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन

महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. राज्यांना गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून, सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. झिका विषाणू संसर्ग झालेल्या गरोदर महिलांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे आदेश असून राज्यांनी बाधित भागातील आरोग्य सुविधा केंद्रांना झिका विषाणू संसर्गासाठी गरोदर महिलांची तपासणी करण्याचे आणि विषाणू संसर्ग झालेल्या मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. भारतात 2016 मध्ये गुजरात राज्यात प्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती. यावर्षी महाराष्ट्रात पुण्यात सहा, कोल्हापूर एक आणि संगमनेर या ठिकाणी एक अशी झिका विषाणूच्या आठ रुग्णांची नोंद झाली आहे.