उमेदवार द्यायचे की पाडायचे? मराठा समाजाची रविवारी बैठक

उमेदवारीसाठी ८०० अर्ज, जरांगेंचा आजपासून इच्छुकांशी संवाद

सरकारने ओबीसीतून मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची आंतरवाली सराटी येथे गुरुवारी बैठक बोलावली आहे. २८८ विधानसभा मतदारसंघातून ८०० पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. या सर्वांशी जरांगे पाटील संवाद साधणार आहेत. रविवार २० ऑक्टोबर रोजी पुन्हा मराठा समाजाची बैठक होणार आहे. यात उमेदवार द्यायचे की पाडायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे.

◾ लोकसभेच्या दुप्पट ताकद विधानसभेत दाखवू
मराठा समाजाने लोकसभेच्या वेळी जेवढी ताकद दाखवली होती त्याच्या दुप्पट विधानसभेच्या निवडणुकीत दाखवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सत्ता असल्यामुळे सरकार मराठा आरक्षण देऊ शकत होते, मात्र सरकारने दिले नाही. आता मात्र या सरकारला पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे की नाही हे आम्ही ठरवू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.