श्रीगोंदा हादरलं! दलित महिला सरपंचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न – समाजात संतापाचा ज्वालामुखी फुटला!
देशभर ७९ वा स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा होत असतानाच महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे.


दिनांक : १८ ऑगस्ट २०२५
ठिकाण : सुरोडी, ता. श्रीगोंदा
देशभर ७९ वा स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा होत असतानाच महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. दलित समाजावरील अत्याचार कधी थांबणार? कायदा आणि सुव्यवस्था अजूनही जिवंत आहे का?
असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
काय घडलं?
सुरोडी गावातील विद्यमान दलित महिला सरपंच मीनाक्षी रामदास सकट या काल (१७ ऑगस्ट) प्राणघातक हल्ल्याला बळी ठरल्या. काही जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांनी त्यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात त्यांची गाडी पूर्णतः जळून खाक झाली, तर मीनाक्षी सकट स्वतः जखमी झाल्या आहेत.
त्यांच्यासोबत असलेला लहान मुलगाही जखमी झाला आहे.
गावासाठी झटणाऱ्या सरपंचबाईंवर हल्ला!
गेल्या चार वर्षांपासून मीनाक्षी सकट या गावाच्या विकासासाठी झटत होत्या. महिलांसाठी न्याय, दलित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. याच कामामुळे काही गावगुंड त्यांच्यावर नाराज होते. सततच्या त्रासानंतर आता थेट प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे समोर आलं आहे. 
२४ तास उलटले, तरी आरोपी फरार!
या घटनेनंतर २४ तास उलटले, तरी आरोपींना अटक करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरलं आहे. यामुळे दलित समाज व बहुजन संघटनांमध्ये प्रचंड संताप आहे.
आज श्रीगोंद्यात मोठा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आला. या प्रसंगी आर.पी.आयचे नेते जिवाजीराव घोडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप, कुणाल शिरवाळे, नंदकुमार ससाने, निलेश गायकवाड, संदीप भोईटे, राजू ससाने, अँड. प्रेरणा धेंडे, रतन पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

आंदोलनादरम्यान पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. समाज बांधवांनी स्पष्ट इशारा दिला की –
“गुन्हेगारांना दोन दिवसांत अटक न केली, तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल!”
पोलीस प्रशासनाची तयारी
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. दोन पथके आरोपींना पकडण्यासाठी कार्यरत असून, “लवकरच आरोपींना जेरबंद करू!” असा दावा पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की – दलित महिला नेतृत्वाला सहन न करणाऱ्या प्रवृत्ती आजही समाजात जिवंत आहेत.
पण यावेळी समाज रस्त्यावर उतरला आहे आणि न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी एकमुखी भूमिका घेतली आहे.
️
#Shocking #DalitJustice #MetroPortal #ViralNews #Srigonda