राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर ; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ पदाधिकाऱ्यांची सांगली येथे झालेल्या बैठकीत राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगार प्रलंबित मागण्यांसंदर्भात १६ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय झाला असल्याचे राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी सांगितले. साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवाशर्ती ठरविणेबाबत शासनाने तातडीने त्रिपक्ष कमिटी गठीत करावी, साखर उद्योगातील कामगारांचे थकीत वेतन मिळावे, साखर उद्योगातील रोजदारी, कंत्राटी, नैमित्तीक व तात्पुरते काम करणाऱ्या कामगारांनाही त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे अंमलबजावणी करून वेतनवाढ समान कामाला समान वेतन मिळावे, भाडेतत्वावर व भागीदारीने व विक्री केलेल्या तसेच खाजगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळावे, थकीत पगाराची रक्कम अग्रकमाने मिळावी, १० फेब्रुवारी २०२४ रोजीच्या कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या आदी मागण्यांसाठी दोन्ही राज्यव्यापी संघटनानी शासनास संपाच्या नोटीस दिलेल्या आहेत. या बैठकीला राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष. तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.