सलग सुट्ट्यांमुळे सुपा उद्योगनगरीत महावितरणला शटडाऊन !
उत्पादन निर्मितीला मोठा फटका बसण्याची शक्यता
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा उद्योगनगरीत महावितरणचा शनिवारी (दि. १७) शटडाऊन असणार आहे. तसेच एक दिवसाआड असलेल्या सुटी येत असल्याने कारखानदारांच्या उत्पादन निर्मितीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या शनिवार ऐवजी नंतर शटडाऊनचा विचार करावा, अशी मागणी सुपा कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी केली. गुरुवारी (दि.१५) स्वातंत्र्य दिन असल्याने सर्व कर्मचारी, कामगारांना सुटी आहे. शनिवारी (दि.१७) विद्युत वितरण कंपनीने शटडाऊन घेणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे कारखाने बंद ठेवावे लागतील. त्यानंतर सोमवारी (दि.१९) रक्षाबंधन असल्याने सुटी राहील. त्यामुळे तीन दिवस कारखाने बंद ठेवावे लागतील. अर्थात, कारखाना बंद व चालू प्रक्रिया यात उत्पादन सुरळीत होते कुठे की लगेच बंद करावे लागणार आहे. गुरुवारी (दि.१५) बंद, शुक्रवार (दि.१६) सुरू, शनिवारी (दि.१७, शटडाऊन) बंद, रविवारी (दि.१८) सुरू, तर सोमवारी (दि.१९ ला रक्षाबंधन) पुन्हा बंद राहील. मंगळवारी (दि.२०) पुन्हा कारखाने सुरू, राहतील, असे दिवसाआड कारखाने चालणार आहेत. त्यामुळे अडचणी वाढतील. पुढे वेळेत माल पुरवावा लागतो. तसे झाले नाही तर ऑर्डरवर परिणाम होतो. याचाही फटका कारखानदारांना बसणार आहे. येत्या शनिवारी घेण्यात येणारे शटडाऊन विद्युत वितरण कंपनीने पुढच्या आठवड्यात घेतले तर होणारे नुकसान टाळता येईल, असे अध्यक्ष अनुराग धूत यांनी सांगितले.