जिल्ह्यात ५०० तृतीयपंथी मतदार; पण केवळ २०१ जणांनीच केली नोंदणी

जनजागृतीचा अभाव असल्याने यावेळीही नोंदणी कमीच!

अहिल्यानगर : मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथी व्यक्तींचा स्त्री- पुरुषांप्रमाणे मुख्य प्रवाहात समावून घेण्यासाठी, व्यक्ती म्हणून हक्क, अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु तृतीयपंथी नागरिकांमध्ये मतदार नोंदणी व मतदानाबाबत जागृतीचा अभाव दिसून येतो. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत ३७ लाख ६० हजार ५१२ मतदार आहेत. यामध्ये केवळ २०१ तृतीयपंथी मतदारांनी नोंद केली आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. एकीकडे इच्छुक उमेदवारांची पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड आहे तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक शाखेने विशेष मोहीम राबविली होती. मात्र, त्या प्रमाणात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढलेली नाही. जिल्हात किमान ५०० तृतीयपंथी आहेत. परंतु त्यापैकी केवळ २०१ जणांनी नोंदणी केली आहे.