तालुक्यामध्ये एमआयडीसी असूनही, तरुणांवर बेरोजगारीची वेळ !

श्रीरामपूर : शहरातील एमआयडीसीमधील ५० टक्के कंपन्या बंद आहेत. उर्वरित चालू असलेल्या कंपन्यांमध्ये परप्रांतीय लोक काम करीत असल्याने तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकरी-धंद्यांसाठी पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना जावे लागते. श्रीरामपूर तालुक्यात नोकरीच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत, श्रीरामपूर आणि राहुरी अशा दोन एमआयडीसी असूनही त्यात स्थानिक तरुणांना नोकरीच्या संधी नाहीत. त्यामुळे येथील तरुण पुण्या-मुंबईची वाट धरत आहेत. काही आपला छोटासा व्यवसाय थाटून चरितार्थ चालवत आहेत. आजची तरुणाई ही स्मार्ट असून, त्यांना जास्त सांगण्याची गरज नाही. अनेक तरुण हे आपले शिक्षण संपल्यावर जेथे पैसा जास्त आहे, त्या गावाला जाणे पसंत करतात. चांगली नोकरी आणि हुद्दा त्यांना या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांचा बाहेर जाण्याकडे कल वाढत असल्याचे ओगले यांनी सांगितले. तालुक्यातील बेरोजगारीमुळे तरुणांना दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचा आरोप काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी केला आहे. शेतकरी युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, बाबासाहेब दिघे, दीपाली ससाणे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.