“भोजापुर चारी आम्ही केली, तुमचं योगदान काय?” – बाळासाहेब थोरातांचा थेट सवाल!
भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आणि कारखान्याच्या माध्यमातून ही चारी उभारण्यात आली.
Share
“भोजापुर चारी आम्ही केली, तुमचं योगदान काय?” – बाळासाहेब थोरातांचा थेट सवाल!
संगमनेर | संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि दुष्काळग्रस्त भागाला जीवनदान देणाऱ्या भोजापुर चारी संदर्भात आता मोठं राजकारण रंगतंय. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत थेट विरोधकांना सवाल केला
३५ वर्षे खासदारकी करताना तुम्ही या चारीसाठी एक खडा तरी उचललात का? नान्नज दुमालासह परिसरासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजना कुणी रद्द केल्या?
ही सवालांची मालिकाच सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.
चारीचं श्रेय कुणाला?
भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आणि कारखान्याच्या माध्यमातून ही चारी उभारण्यात आली. कारखान्याने तब्बल ८० लाख रुपयांचा निधी खर्च केला. त्यावेळी थोरात जलसंधारण मंत्री असताना वेळोवेळी शासनाकडून निधी मिळवून हे काम पुढे नेलं.
महाविकास आघाडीच्या काळात शंकरराव गडाख जलसंधारण मंत्री असताना आणखी २ कोटी १२ लाख रुपये मिळाले. कारखान्याने दरवर्षी चारीची दुरुस्ती आणि देखभाल केली. आज ही चारी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचली असून पाणी देवकवठ्यापर्यंतही पोहोचलं आहे.
थोरात यांनी स्पष्ट सांगितलं ही चारी काही दिवसांत उभी राहिलेली नाही, यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागली आहे.
“पावसाचा फायदा झाला, पण काम आमचं”
थोरात म्हणाले की, यावर्षी मे महिन्यात पाऊस चांगला पडल्याने पाणी लवकर आलं, मात्र त्यामुळे आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता जाब विचारला पाहिजे.
“काम आम्ही केलंय, निधी आम्ही उभारला, चारी आम्ही केली. मग तुमचं योगदान काय?” असा थेट सवाल विरोधकांना.
विकासाच्या वाटचालीत अडथळे?
थोरात यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले – तालुक्यातील रस्त्यांसाठी मिळालेला १५० कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आला. त्यातील तब्बल ४० कोटी रुपये दुसऱ्या तालुक्यात वळवले गेले. नान्नज दुमाला आणि निमोनसह परिसरासाठी मंजूर केलेल्या तीन उपसा सिंचन योजना रद्द केल्या.
“ही सुडाचं राजकारण आहे. खोट्या-नाट्या केसेस लावल्या जात आहेत. ३०७, ३५३ सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे.”
संगमनेरचा लौकिक टिकवूया!
थोरात म्हणाले –
“४० वर्षांच्या कष्टातून संगमनेर तालुका उभा केला. इथलं शिक्षण, सहकार, बाजारपेठ, सुरक्षितता, शांतता आणि समृद्धी आज राज्यात आदर्श आहे. हे एका दिवसात झालेलं नाही. संघर्ष, मेहनत आणि सातत्य यामुळे हे शक्य झालं आहे.”
ते पुढे म्हणाले “सोशल मीडियावर खोट्या पोस्ट, व्हिडिओ टाकले जात आहेत. तालुक्याच्या विरोधात हत्यार होऊ नका. विकासाचं काम जपायचं आहे, अशांतता निर्माण करणाऱ्यांना थांबवलं पाहिजे.”
डॉ. तांबे यांची साथ
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही बाळासाहेब थोरातांच्या कामाचा गौरव केला. “निळवंडे धरण, कालवे, पाणीपुरवठा योजना – हे सर्व त्यांच्या संघर्षामुळे शक्य झालं. आज तालुका समृद्ध आहे कारण थोरातांनी आयुष्यभर पाण्यासाठी लढा दिला.”
थोरातांचा अंतिम संदेश
“नान्नज दुमाला, निमोनसाठीच्या पाणीपुरवठा योजना आम्ही मंजूर करून ठेवल्या होत्या. मात्र सरकार बदलताच त्या रद्द झाल्या. का रद्द केल्या? या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. तालुक्याच्या विकासाचं चाक थांबवू नका. चला, आपण सगळे मिळून एकजुटीने या संघर्षाला सामोरं जाऊया.”
तुम्हाला काय वाटतं? भोजापुर चारीचं खरं श्रेय कुणाला? विरोधकांचं योगदान आहे का? की हा विकास फक्त थोरातांच्या संघर्षामुळे शक्य झाला? तुमची मतं कमेंटमध्ये जरूर सांगा!