जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबरला जनजागृती रॅली!
अहिल्यानगर : जागतिक एड्स दिनानिमित्त समाजात व्यापक प्रमाणावर जनजागृती होण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अंतर्गत शहरात एचआयव्ही एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. रॅली दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथून प्रारंभ करून अप्पू हत्ती चौक – सर्जेपुरा- मंगळवार बाजार चौक – बागडपट्टी – सिद्धी बाग – न्यू आर्टस् कॉलेज – अप्पू हत्ती चौक मार्गे जिल्हा रुग्णालयात समारोप केला जाणार आहे. या जनजागृती रॅलीमध्ये शहरातील रेड रिबीन क्लब असलेले सर्व महाविद्यालय तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, एड्स प्रकल्पातील संस्था व लाभार्थी सहभागी होणार आहेत रॅलीच्या प्रारंभी पथनाट्य, मानवी साखळी याद्वारे उपस्थित त्यांना एचआयव्ही प्रतिबंध बाबत संदेश देण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा उपस्थित पाहुणे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.