‘येरे येरे पैसा 3’ टीमची शिर्डीत साईदर्शनाला हजेरी – यशासाठी साई चरणी साकडं
कलाकार तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी साईसमाधीचं दर्शन घेतलं.



18 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या धमाल कॉमेडी फिल्म ‘येरे येरे पैसा 3’ च्या यशासाठी टीमनं साईबाबांच्या चरणी लीन होत साईदर्शन घेतलं! शिर्डीच्या पवित्र वातावरणात कलाकार तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी साईसमाधीचं दर्शन घेतलं.
व्हायरल व्हिडिओमध्ये सर्व कलाकार साई चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत. साई संस्थानचे CEO गोरक्ष गाडीलकर यांनी टीमचा सत्कार केला. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना, निर्माता अमेय खोपकर म्हणाले – “चित्रपट TV किंवा OTT वर येण्याची वाट न पाहता, थिएटरमध्ये जाऊन बघा!”
‘येरे येरे पैसा’ या हिट फ्रँचायझीचा हा तिसरा भाग असून, महाराष्ट्रभर टीमने जोरदार प्रमोशन केलं आहे. संजय जाधव म्हणाले – “हा फक्त पैसा नाही, तर नात्यांचा, भावनांचा आणि धमाल विनोदांचा प्रवास आहे.”
अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाले – “शेतकऱ्यांना पाऊस हवा, तसंच कलाकारांना प्रेक्षकांचा प्रतिसाद. त्यामुळे साईबाबांकडं प्रार्थना केली.”
तेजस्विनी पंडित म्हणाल्या – “साईबाबांसमोर सगळे सारखेच. आम्ही कलाकार असलो तरी सामान्यच आहोत. यंदा प्रेक्षक मराठी सिनेमाला भरभरून प्रतिसाद देत आहेत, ‘येरे येरे पैसा 3’ देखील त्यातलं एक पाऊल ठरेल, याची खात्री आहे.”
उद्या (18 जुलै) 300 स्क्रीन्सवर होतोय भव्य रिलीज!