तंबाखू विक्रेत्याची २० लाखांची फसवणूक
अहमदनगर —– फ्लॅट खरेदीत तंबाखू विक्रेत्याची २० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली असून या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन प्रकाश जेटला (वय ३०, रा. नालेगाव, अहमदनगर) यांनी या प्रकरणी आरोपी बिल्डर आयुब बशीर खान (रा. रूबाबशीर बंगला, शिलाविहार सावेडी, अहमदनगर) याचा विरोधात फिर्याद दिली आहे. जेटला यांचा तंबाखू विक्रीचा व्यवसाय आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की सन २०१६ साली बिल्डर आयुब खान याने शहरातील सातपुते तालमीजवळ फ्लॅट विक्रीसाठी बनविले असल्याची माहिती फिर्यादी जेटला यांना मिळाली होती. जेटला यांना घर खरेदी करायचे असल्याने त्यांनी शेख याच्याकडे फ्लॅट खरेदीबाबत विचारपूस केली. त्यावेळी खान याने बिल्डींगची कागदपत्रे आणि उतारे दाखवून फ्लॅट खरेदीची तयारी दर्शवली होती. दि. ८ एप्रिल २०१६ रोजी आरोपी खान याने फिर्यादी जेटला यांच्या वडीलांना तिसर्या मजल्यावरील फ्लॅट नंबर १६ अ च्या क्षेत्रफळाचे १२ लाख रूपयांचे अर्धवट बांधकामाचे साठेखत करून दिले होते. त्यापैकी आठ लाख रूपये चेकने तर चार लाख रूपये रोख स्वरूपात देण्यात आले होते.
बिल्डर आयुब खान याने साज अपार्टमेंटचा तिसरा मजला अधिकृत आहे, असे सांगून फ्लॅट विक्रीत २० लाख रूपयांची फसवणूक केली. रोहन जेटला यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे या प्रकरणाचा तपास करत आहेत.