शहरातील मिरवणुकीचा मार्ग बदलण्यास आक्षेप

नगर शहरातील यापुढे निघणाऱ्या मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इम्पिरियल चौक, माळीवाडा वेस, आयुर्वेद कॉर्नर, अमरधाम समोरून नेप्ती नाका, दिल्ली गेट, या मार्गांच्या प्रस्तावावर मान्यता देणे प्रस्तावित आहे. या मार्गाच्या निश्चितीसाठी कोणाची सूचना अथवा हरकत असल्यास 30 जूनपर्यंत लेखी स्वरुपात सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. दरम्यान या प्रस्तावास भाजप नेते अॅड. अभय आगरकर व शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी विरोध दर्शवला आहे. नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, तक्ती दरवाजा, कापड बाजार तेली खुंट, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट या मार्गाने मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणूक मार्गातील रस्ते लहान आहेत. मिरवणुकीत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. मिरवणूक मार्गावर यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद होऊन मोठ्या प्रमाणावर जातीय तेढ निर्माण झालेली असून एकमेकांविषयी द्वेष भावना वाढीस लागल्याचे निदर्शनास येत आहे. सर्व प्रकारच्या मिरवणुका या कापड बाजारातून जात असल्याने बॅरीकेटमुळे व्यावसायिकांचे व्यवहार बंद होतात. त्यामुळे बाजारपेठेतील ग्राहकांचे व व्यापाऱ्यांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झालेली असून ते रोष व्यक्त करत असल्याने या पुढील कालावधीमध्ये काढण्यात येणारी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, कत्तलची रात्र व मोहरम विसर्जन मिरवणूक या पारंपरिक उत्सव मिरवणूक वगळता नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून कापड बाजारातून सर्व प्रकारच्या मिरवणुका न नेता प्रशासकीय स्वयंनुसार भविष्यकालीन मिरवणुकांसाठीच्या प्रस्तावास मान्यता देणे प्रस्तावित आहे. मात्र या प्रस्तावास विरोध दर्शवत भाजप नेते अॅड. अभय आगरकर म्हणाले की, शहराबाहेरून अमरधाम मार्गे मिरवणुका कशा होऊ शकतात? नागरिकांनी उत्सवात सहभागी सहभागी व्हावे, समाजाने यातून प्रेरणा घ्यावी, स्फूर्ती घ्यावी, आमचे मानबिंदू स्थापित व्हावेत, राष्ट्रपुरुषांचा इतिहास जागृत राहावा. तसेच त्यांचे स्मरण करून समाजात आदर्श निर्माण व्हावेत, त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिरवणुका काढल्या जातात. पोलीस प्रशासनाच्या सांगण्यावरून व अहवालावरून हा प्रस्ताव करण्यात आलेला आहे. मिरवणूक मार्गावर हिंदू व मुस्लिम संमिश्र लोकवस्ती असलेली ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी वाद होऊन जातीय तेढ निर्माण झाली व त्यातून द्वेष भावना वाढीस लागल्याचे कारण प्रशासनाने पुढे केले आहे. मात्र सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व इतर वेळीही समाजकंटक, कायम दंगे करणारे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने करू नये, हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे. तर शिवसेनेचे संभाजी कदम यांनी नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सर्व शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटना भव्य मिरवणूक काढतात. सर्व नगरकर या शिवजयंती उत्सवात सहभागी होतात. या उत्सवाचे स्वरूप आता वाढत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही उत्साहात साजरी होते. या मिरवणुकांना मोठी परंपरा आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून शहरातून मिरवणूक काढली जाते, त्यामुळे या मिरवणुकांचे मार्ग बदलता येणार नाहीत. असे म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी प्रशासनाचा निवडणूक मार्ग बदलण्याच्या प्रस्तावावर हरकत घेतली आहे. शहरातून जाणारे मार्ग बदलून शहराबाहेरून महामार्गावरून मिरवणूक प्रस्तावित करणे म्हणजे सण व उत्सवात नागरिकांना सहभागी होण्यापासून रोखण्यासारखेच आहे. असे ते म्हणाले.