शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाच दिवसीय आरोग्य शिबिराचा समारोप
हजारो रुग्णांनी घेतला लाभ 23 रुग्णांवर गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया होणार मोफत
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या पाच दिवसीय विविध मोफत आरोग्य तपासणी व गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया शिबिराला शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात हजारो रुग्णांची विविध प्रकारच्या मोफत तपासण्या करण्यात आले. तर यामधील 23 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
पाईपलाईन रोड येथील साई माऊली हॉस्पिटल मध्ये झालेल्या सर्व रोग निदान तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराने या पाच दिवसीय शिबिराचा समारोप करण्यात आला. साई माऊली हॉस्पिटलमध्ये झालेल्या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अनिकेत कराळे, उपजिल्हाप्रमुख काकासाहेब शेळके, डॉ. संतोष गीते, डॉ. गणेश मिसाळ, डॉ. जितेंद्र ढवळे, पंकज वर्पे, डॉ. तुकाराम गिते, डॉ. प्रतिभा पवार, डॉ. योगिता दरेकर, मुन्ना भिंगारदिवे, डॉ. युवराज टकले, डॉ. दिपाली दहिफळे, प्रशासक विनोद पाटील आदी उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले की, या पाच दिवसीय शिबिराला सर्वसामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागरुकता निर्माण होत असली तरी खर्चिक आरोग्य सुविधा परवडत नसल्याने त्यांना मोफत शिबिराशिवाय पर्याय नाही. सर्वसामान्यांना आधार हेच ध्येय ठेवून शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. जनहित पाहणारे सरकार सत्तेवर आले असून, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून जिल्ह्यासाठी साडेसात कोटी रुपये गरजू रुग्णांना देण्यात आले आहे. रुग्णांना तातडीची मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिकेत कराळे म्हणाले की, खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना मिळण्यासाठी शहरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांचे निरोगी आरोग्य व व्याधीमुक्त जीवन करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कटिबध्द असल्याचे सांगितले. काकासाहेब शेळके यांनी सर्वसामान्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून तातडीने मदत उपलब्ध करुन दिली जात आहे. वैद्यकीय मदतीच्या कोणत्याही अडचणी असल्यास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले. पाच दिवसीय शिबिरात अस्थिरोग, कॅन्सर, नेत्रचिकित्सा, रक्तदाब, मधुमेह आदी गंभीर आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच नवजात बालकांची देखील तपासणी करण्यात आली. गरोदर मातांना आहार व व्यायामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सदस्यांचे परिश्रम लाभले.