काँग्रेसच्या त्या पदाधिकार्‍याने प्रसिध्दीसाठी जेंव्हा-जेंव्हा राजकारण केले, तेंव्हा ते जनतेपुढे खोटे ठरले -संदीप भांबरकर

दोन समाजात तिढा असल्याचे प्रसिध्दीसाठी भासविण्याचे प्रयत्न करु नये

अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रसिध्दीसाठी जेंव्हा-जेंव्हा राजकारण केले, तेंव्हा ते जनतेपुढे खोटे ठरले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी केला आहे. तर दोन कुटुंबाच्या खाजगी जागेच्या वादात  दोन समाजात तिढा असल्याचे प्रसिध्दीसाठी भासविण्याचे प्रयत्न न करण्याचे सांगून, गलिच्छ राजकारण करुन शहरात काँग्रेस पक्ष वाढवत आहात, की संपवत आहात? हा प्रश्‍न भांबरकर यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील मार्केटयार्ड मध्ये औसरकर व बोरा यांच्या मालमत्तेचा वादाची पूर्ण माहिती न घेता काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षाने राजकारण केले. मुळात औसरकर व बोरा यांच्यामध्ये मालमत्तेचा वाद असून, सदर मार्केट यार्डमधील मालमत्ता पोपट बोरा यांच्या मालकीची होती. त्यांच्या मृत्यूनंतर 17 फेब्रुवारी 2021 रोजी पोपट बोरा यांच्या पत्नी व मुला-मुलींनी ती अजित औसरकर यांना रितसर विकली. अजय बोरा हे पोपट बोरा यांचे पुतणे होते. फक्त सदर दुकान ते सांभाळत होते. या वादाची पूर्ण शहानिशा न करता, त्या काँग्रेसच्या पदाधिकार्‍याने औसरकर कुटुंबीयांना कार्यसम्राटचे कार्यकर्ते व गुंड ठरवले. सदर मालमत्तेचा वाद न्यायप्रविष्ट होता. उच्च न्यायालयाने देखील औसरकर यांच्या बाजूने निकाल दिला आहे. याची पूर्ण माहिती न घेता केवळ प्रसिध्दीसाठी खोटे राजकारण करण्यात आले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात भांबरकर यांनी म्हंटले आहे.
लालटाकी येथे पार्किंगचे वीस रुपये न भरता पार्किंग वरून राजकारण केले, शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने एमआयडीसीमधील आयटी पार्कची सर्व माहिती काढली असल्याची माहिती मिळताच तेथे प्रसिद्धी मिळेल म्हणून खोटे राजकारण केले, याआधी जमीन ताबा घेण्यावरून भळगट कुटुंब प्रकरणात त्यावेळी कुठलीही शहानिशा न करता व पूर्ण माहिती न घेता कार्यसम्राटचा कुठलाही संबंध नसताना त्यांच्या नावाने राजकारण केले होते. त्यावेळी या काँग्रेस पदाधिकार्‍याच्या सहकारी व्यक्तीने सध्या काढलेल्या पत्राप्रमाणे दोन समाजात जातीय तेढ निर्माण करू नये, असे पत्र काढले होते. शहरातील रस्त्यांच्या खड्डे प्रश्‍नी फक्त प्रसिद्धीसाठी महापालिकेवर आसूड मोर्चा घेऊन गेले होते. पण त्यापुढे कुठलाही पाठपुरावा केलेला नाही. मी एक सामान्य नागरिक असताना त्याविषयी न्यायालयात दावा दाखल केला. एक पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असताना तुम्हाला ते जमले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
स्वर्गीय मा.आ. अनिल राठोड यांच्या नंतर शहरात तो काँग्रेसचा पदाधिकारी अन्यायाविरुद्ध लढणारे दुसरे भैय्या म्हणून दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. परंतु स्वर्गीय अनिल भैय्या यांनी प्रत्येक गोष्टींची शहानिशा करून समोरच्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षाने एका समाजाला कमी लेखून त्या समाजातील तरुण वर्गाला तुमचा व कार्यसम्राटमधील वादाचा वापर करून त्या समाजामधील व्यापारी तरुणांना गुंड ठरवून राजकारण केले. शहरातून सत्यजित तांबे यांनी आमदारकी लढवली होती, पण असे गलिच्छ राजकारण केले नाही. कोणत्याही प्रकरणात राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्याला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न थांबवण्याचे म्हंटले आहे. तर औसरकर-बोरा जागेच्या प्रकरणात दोन समाजात तेढ असल्याचे वातावरण निर्माण केल्याबद्दल समाजाची जाहीर माफी मागण्याचे भांबरकर यांनी सांगितले आहे.