कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती येण्यासाठी सामभारत अभियान

कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती प्रत्येक भारतीयांना येण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्यावतीने सामभारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रलंबीत प्रश्न व वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती ऍड . कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली .


कायद्याचे राज्य खऱ्या अर्थाने सुरू ठेवण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाला बरोबर न्यायसंस्थेवर येते . परंतु गेल्या तीस वर्षांत लाखो प्रलंबित खटल्यामुळे न्याय स्वस्तात , त्वरित आणि खऱ्या अर्थाने मिळण्याची शक्यता दुरावली गेली आहे . यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास न्यायसंस्थेवरुन कमी होताना दिसत आहे . सर्व खटल्यांची संख्या निम्म्यावर आणण्यासाठी सामभारत अभियानाचा उपयोग होणार आहे . त्याचबरोबर शेतरस्त्यांची वाढ , नाल्यांवरील अतिक्रमणे दूर करणे व जलसंधारणाच्या कामास गती देण्यासाठी हे तंत्र प्रभावी ठरणार आहे . निसर्गाचे नियम , देशाचे कायदे आणि वैयक्तिक जीवनातील नीतिमत्ता पायदळी तुडवून कोणालाही यश येऊ शकत नाही . त्यामुळे तडजोडीने आणि सामजस्याने छोटे आणि मोठे प्रश्न सुटू शकणार आहे . पाथर्डी तालुक्यातील मिरी गावातील शेतरस्त्याचा वाद आणि ओढे , नाल्यांवरील अतिक्रमणे जलसंधारणाच्या कामासाठी दूर करण्यासाठी या तंत्राचा वापर करणार असल्याचे असल्याचे ऍड . गवळी यांनी म्हंटले आहे . या अभियानासाठी ऍड . गवळी , अशोक सब्बन , कॉ . बाबा आरगडे , जालिंदर बोरुडे , पै . नाना डोंगरे , विजय भालसिंग , वीरबहादूर प्रजापती , सुधीर भद्रे , शाहीर कान्हू सुंबे , बाळासाहेब गायकवाड , विठ्ठल सुरम , अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.