टँकरसाठी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील करोडी गावाला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा. यासाठी गेल्या दीड महिन्यांपूर्वी टँकरसाठी दाखल केलेल्या प्रस्तावावर कारवाई केली गेली नाही. म्हणून ग्रामस्थांनी पाथर्डी-बीड राज्य मार्गावर शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्त्व आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, गावचे सरपंच आश्रुबा खेडकर यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील करोडी गाव आणि परिसरातील वाड्यावर पाण्याची कमतरता भासू लागल्याने दीड महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्यासंदर्भात टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. पंचायत समिती स्तरावर हा प्रस्ताव होऊन मंजुरीला जाणे अपेक्षित असताना पंचायत समिती प्रशासनाकडून ग्रामीण भागाच्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नाला गंभीरपणे घेतले नाही. पाण्यासाठी लोकांचे हाल होऊन पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. याची पूर्वकल्पना प्रशासनाला देऊनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करायला पाहिजे होता, मात्र जून महिना उजाडला तरीही पिण्यासाठी पाण्याचे टँकर ग्रामस्थांना मिळाले नाही. प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन लोकांना पाण्याविना मारण्याचे काम करीत असल्याच्या भावना आंदोलकांनी भाषणातून व्यक्त केल्या आहेत. वेळोवेळी प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याबाबत टँकर सुरू करावे या मागणीसाठी निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत बीड-पाथर्डी रस्त्यावर आंदोलन केले.