नगरचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी सलग तीन दिवस चालवली सायकल

एक हजार किलोमीटरचा प्रवास 64 तास 40 मिनिटात पुर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी) – घर घर लंगर सेवेचे सेवादार तथा सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी राजकोट ते दाहोद असा परतीचा एक हजार कि.मी. चा प्रवास तीन दिवसात पुर्ण केल्याबद्दल त्याचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सन्मान करण्यात आला. नुकतेच वधवा यांचे शहरात आगमन झाले असता, त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

जस्मितसिंह वधवा यांचा सत्कार जनक आहुजा व प्रिथपालसिंह धुप्पड यांनी केला. यावेळी हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, मनोज मदान, सतीश गंभीर, कैलास नवलानी, सागर पंजाबी, सुनील थोरात, रितेश बजाज, शरद बेरड, पुरषोत्तम बेटी, प्रमोद पंतम, कैलास नवलानी, राजन थापर, राजू जग्गी, सिमरजितसिंह वधवा, सुनील मेहतानी आदी उपस्थित होते.

जनक आहुजा म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व घर घर लंगर सेवेला जोडले गेले आहे. या सामाजिक कार्यात युवक सेवादारांचे मोठे योगदान राहिले. सायकलपटू जस्मितसिंह वधवा शहराचे वैभव असून, त्याने यापूर्वी देखील अनेक आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावून शहराचे नाव उंचावले असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना जस्मितसिंह वधवा यांनी सदृढ आरोग्य व प्रदुषणमुक्त शहर होण्यासाठी नागरिकांमध्ये सायकल वापरली गेली पाहिजे. सायकल वापरण्याबद्दल मनात असलेली चूकीची समज व न्यूनगंड दूर होण्याची गरज असून, युवकांना त्यांनी सायकल चालवून आरोग्य सदृढ व शहर प्रदुषणमुक्त ठेवण्याचा त्यांनी संदेश दिला. अवघड असा सायकल प्रवास पुर्ण केल्याबद्दल वधवा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी राजकोट-मोरबी-अहमदाबाद-गोधरा-दाहोद आणि याच मार्गाने परतीचा प्रवास असा एकूण एक हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर अवघ्या तीन दिवसात (64 तास 40 मिनिटात) पुर्ण केला. त्यांचा हा प्रवास रात्रं-दिवस सुरु होता. यामध्ये तीन दिवसात फक्त त्यांनी पाच तास जेवण व इतर गोष्टींसाठी विश्रांती घेतली.