पारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन

पारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय बंद करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने खुलेआम अवैध दारू व्यवसाय चालत असल्याचा आरोप करण्यात आला असून, अवैध दारू व्यवसायावर कारवाई न झाल्यास 21 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त नाशिक येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क यांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू आहे. परमिटरूमच्या लायसन्सचा फार्स फक्त कागदोपत्री दाखवण्यापुरता राहिला आहे. दारु पिऊन वाहने चालविली जात असताना अनेक जणांचा अपघात होत असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. विशेषत: नगर-कल्याण महामार्गावर राजरोसपणे दारू विक्री केली जात आहे. पारनेर तालुका हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा तालुका असून, दारुमुक्तीसाठी प्रशासनाने कठोर पाउले उचलण्याची गरज आहे. पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागात वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. पारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.