महापालिकेचा नगररचना विभाग भ्रष्टाचार, गैरव्यवहार व दप्तरदिरंगाई मुक्त करावा

खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आयुक्तांकडे सैनिक समाज पार्टीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या नगररचना विभागातील खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेऊन चौकशी करावी व सर्वसामान्यांना सेवा मिळण्यासाठी हा विभाग भ्रष्टाचार, गैरव्यवहार व दप्तरदिरंगाई मुक्त  करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी केली आहे.
बांधकाम परवाने, पुर्णत्वाचे दाखले व रेखांकन मंजुरी या विभागातून होत असल्याने सर्वाधिक मलाईदार विभाग म्हणून नगररचना विभाग ओळखला जातो. कॉन्ट्रॅक्टर मार्फत थेट अधिकारीच लाच घेत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. ही खाबूगिरी सर्वसामान्य जनतेसाठी मोठी अडचण ठरत असून, याचा मोठा अनुभव येत असल्याचे अ‍ॅड. डमाळे यांनी म्हंटले आहे.
बांधकाम परवानगी ला अतिरिक्त पैसे लागतात ते कॉन्ट्रॅक्टर तर्फे अधिकारी घेतात का?, बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात का? अतिक्रमण विभागाकडून अतिरिक्त वसुली केली जाते का? हे प्रश्‍न निवेदनात उपस्थित करुन यावर चौकशी करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागात मोठा सावळा गोंधळ सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून मध्यस्थी असलेले कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन अधिकारी यांना पुरवितात. त्याशिवाय संबंधित विभागाशी निगडीत असलेले कामे होत नाही. हा विभाग भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा. -अ‍ॅड. शिवाजी डमाळे (प्रदेशाध्यक्ष, सैनिक समाज पार्टी)