महिला वकिलाच्या विनयभंग प्रकरणी जिल्हा परिषदेच्या अभियंत्याला तीन वर्षाची शिक्षा

कौटुंबिक हिसाचारचे प्रकरण हाताळणार्‍या महिला वकिलास न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर विनयभंग करुन खंडणी मागणार्‍या जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षल महादेव काकडे याला सत्र न्यायाधीश यांनी तीन वर्ष कैद व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयाने वकिलांवर हात टाकणार्‍यांवर वचक निर्माण झाला आहे. वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सक्षम कायद्याची गरज असल्याची भावना वकिलांमध्ये व्यक्त होत आहे.


शहरातील एका प्रतिष्ठित महिला वकिलाकडे जिल्हा परिषदेचा अभियंता असलेल्या हर्षल महादेव काकडे (रा. केडगाव, शाहूनगर) याच्या विरोधात कौटुंबिक हिसाचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरु होता. काकडे याच्या पत्नी व तीच्या वडिलांकडून फिर्यादी महिला वकिल काम पाहत होत्या. 10 जून 2010 मध्ये न्यायालयात सुनावणीचे काम झाल्यानंतर महिला वकिल जिल्हा न्यायालयाच्या (जुन्या) बाहेर पडल्यावर आरोपीने त्याच्या विरोधात कौटुंबिक हिसाचाराचा खटला चालवल्याचा राग येऊन महिला वकिलास शिवीगाळ करुन विनयभंग केला. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन बदनामी थांबविण्यासाठी 2 लाख रुपयाची खंडणी मागितली होती. याप्रकरणी महिला वकिलाने 10 जून रोजी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आरोपी हर्षल काकडे याच्या विरोधात भा.द.वि. कलम 354, 323, 504, 506 व 384 याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाचा कोतवालीचे तत्कालीन सहा.पो.नि. चंद्रशेखर सावंत यांनी तपास करुन न्यायालयात चार्जशिट पाठवले होते.


यावर जिल्हा न्यायालयात खटला चालून सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी सहा साक्षीदार तपासून, फिर्यादी व साक्षीदाराचा पुरावा ग्राह्य धरुन आरोपी काकडे याला विनयभंगप्रकरणी तीन वर्ष कैद, पाच हजार रुपये दंड, जिवे मारण्याची धमकी दिल्याल्याप्रकरणी एक वर्ष कैद 5 हजार रुपये दंड, खंडणी मागितल्याप्रकरणी 1 वर्ष कैद व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा 6 डिसेंबर रोजी ठोठावली. या खटल्यात फिर्यादीच्या वतीने अतिरिक्त सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. केदार केसकर यांनी प्रभावीपणे फिर्यादीची बाजू मांडली.