राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त फिनिक्सच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

74 ज्येष्ठ नागरिकांवर होणार मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तेरा ज्येष्ठ नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला. या शिबीरात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व वृत्तपत्र छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला.
या शिबीराचे उद्घाटन पत्रकार निशांत दातीर, दत्ता इंगळे व सुधाकर पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्योजक कैलास खरपुडे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे, वृत्त छायाचित्रकार वाजिद शेख, स्थानिक वृत्त वाहिनीचे साबीर सय्यद, शिवाजी म्हस्के, प्रसाद शिंदे, अ‍ॅड. राजेश कावरे, राजेंद्र बोरुडे, बाबा चव्हाण आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निशांत दातीर म्हणाले की, आज आरोग्य सुविधेपासून अनेक गरजू नागरिक वंचित आहे. कोरोनाने सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, सर्वसामान्यांना आरोग्य सुविधेचा खर्च पेळवत नाही. मनुष्यरुपी सेवेतूनच ईश्‍वरसेवा करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनेने सुरु केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. दत्ता इंगळे यांनी समाजातील महापुरुषांनी वंचितांना नेहमीच आधार देण्याचे कार्य केले. त्यांचे कार्य आजही सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श समोर ठेऊन समाजातील अनेक गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्सचे कार्य दुर्बल घटकांना आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सुधाकर पवार म्हणाले की, नागरदेवळे सारख्या छोट्याश्या गावात आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून दृष्टीदोष असलेल्या सर्वसामान्य घटकांना याचा लाभ मिळत असून, वंचितांची सेवा जालिंदर बोरुडे करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी महागडी उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असून, या शिबीराच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरविण्यात येत आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. रमेश त्रिमुखे म्हणाले की, सर्वसामान्यांचे नेत्रदूत म्हणून कार्य करणारे जालिंदर बोरुडे पद्मश्री पुरस्काराच्या प्रस्ताव यादीत आहे. गोरगरीबांच्या आशिर्वादाने त्यांना नक्कीच पद्मश्री मिळणार असल्याची आशा व्यक्त केली. उद्योजक कैलास खरपुडे यांनी गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणारे जालिंदर बोरुडे नागरदेवळे गावाचे भूषण आहे. आरोग्य शिबीराच्या माध्यमातून त्यांनी संपुर्ण राज्यात गावाचे नांव उंचावले असल्याचे सांगितले.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 397 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 74 रुग्णांची निवड करण्यात आली आहे. या रुग्णांची पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. डॉ. वसंत देशमुख, डॉ. विशाल घंगाळे, सचिन सोनवणे, माया आल्हाट, अमित पिल्ले, प्रशांत शिंदे यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी गरजूंना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. डॉ. मनिषा साळवे, सुजाता खेतमाळीस, आधा धाडगे यांनी ज्येष्ठ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करुन कोरोना लसीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. राजेश कावरे यांनी केले. आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी ओम बोरुडे, सौरभ बोरुडे, जय बोरुडे, संकेत ढाकणे, साई धाडगे, जगदिश बोरुडे यांनी परिश्रम घेतले. या शिबीरासाठी के.के. आय बुधराणी हॉस्पिटल, नागरदेवळे ग्रामस्थ, नागरदेवळे प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे सहकार्य लाभले.