समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करतात -आ. निलेश लंके

नवनाथ विद्या प्रसारक मंडळ संचलित निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाचे उपशिक्षक काशिनाथ पळसकर यांच्या सेवापुर्ती निमित्त त्यांचा सपत्निक आमदार निलेश लंके यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. पळसकर यांनी शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास एकवीस हजार रुपयाची शाळेला देणगी दिली.
पळसकर सेवानिवृत्त झाले असता, त्यांना निरोप देण्यासाठी नवनाथ विद्यालयात सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोकुळ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती रावसाहेब शेळके पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, उपसभापती डॉ. दिलीप पवार, कल्पना पळसकर, संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक किसन वाबळे, भागचंद जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, अजय लामखडे, शिक्षक नेते राजेंद्र लांडे, निमसे सर, डॉ. विजय जाधव, भाऊसाहेब ठाणगे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार, गौरव नरवडे, नामदेव फलके, माजी मुख्याध्यापक रामदास अडसुरे, सुनिल जाधव, अजय वाबळे, मच्छिंद्र ढगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. प्रास्ताविकात मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी शाळेत बत्तीस वर्ष सेवा देत असताना पळसकर सरांनी विद्यार्थी घडविण्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
आमदार निलेश लंके म्हणाले की, सर्वगुण संपन्न शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील शाळांचा गुणवत्तेचा आलेख वाढला आहे. शाळेच्या माध्यमातून पळसकर सरांनी अनेक विद्यार्थी घडवले. समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी वर्गातील मुलांचे भवितव्य उज्वल झाले. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पळसकर यांनी घेतलेले शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना काशीनाथ पळसकर म्हणाले की, शाळा हे मंदिर समजून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. विद्यादानाचे कार्य करताना सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेच्या संचालकांचे सहकार्य लाभले. सर्वांनी साथ दिल्याने मोठी जबाबदारी पुर्ण करु शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कांडेकर यांनी केले. आभार चंद्रकांत पवार यांनी मानले. यावेळी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.