सामाजिक क्रांतीचा महामार्ग ज्योतिबांनी दाखवून दिला -भगवान फुलसौंदर

व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमातून महात्मा फुले यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीचा जागर

सामाजिक क्रांतीचा महामार्ग ज्योतिबांनी दाखवून दिला. समाजाची अधोगती थांबवून, समाजातील मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून समाजाला समता, स्वातंत्र्य आणि माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर ज्योतिबांनी संघर्ष केला. नीतीने वागणे हाच खरा मानवधर्म असल्याची शिकवण त्यांनी दिली. तत्कालीन अंधार युगात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून संपूर्ण मानवाचे जीवन प्रकाशमय केले असल्याचे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्य, अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघ, जय युवा अकॅडमी, जीवन आधार बहुउद्देशीय प्रतिष्ठान आयोजित क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालिकाश्रम रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी फुलसौंदर बोलत होते. यावेळी महापालिकेचे माजी सभापती किशोर डागवाले, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विशाल वायकर, दत्ता जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, अ‍ॅड. सुनिल तोडकर, अ‍ॅड. गौरी सामलेटी, पोपट बनकर, धीरज ससाणे, सुभाष जेजुरकर, विनायक नेवसे, डॉ. संतोष गिर्‍हे, संध्या जोशी, कान्हू सुंबे, रजनी ताठे आदींसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कु. राजश्री झेंडे हिने गीत गायन व पोवाड्यातून महात्मा फुले यांचे कार्य सांगितले. ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल तोडकर यांनी प्रबोधनपर व्याख्यान दिले. उपस्थित मान्यवरांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवनावर आधारित पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
किशोर डागवाले यांनी समाजक्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी मोडीत काढून सत्यशोधक समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. स्त्रियांची अवस्था गुलामगिरी सारखी होती. त्यांना विद्याधन मिळवून देण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षणक्रांतीमुळे बहुजन समाजात आमूलाग्र बदल झाले आहे. आजच्या सामाजिक संस्थांनी फुले दाम्पत्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन कार्य करण्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. भानुदास होले यांनी शिक्षण हे समाजातील समस्या सोडविण्यासाठी प्रभावी असे शस्त्र आहे. म्हणून स्वतःच्या घरापासून महात्मा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ लावीत सावित्रीमाईंना शिक्षित केले. स्त्रियांच्या उद्धारासाठी शिक्षणाची चळवळ पुढे चालवली. फुले दांपत्यांनी सुरू केलेल्या चळवळीतून क्रांतिकारी विचारांचा उदय झाला. मृतप्राय झालेल्या समाजाला ज्ञानामृत पाजण्याचे कार्य महात्मा फुले दांपत्यांनी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महात्मा फुले यांनी समाजसुधारणेचे महान ध्येय खांद्यावर घेऊन अविरतपणे कार्य केले. स्त्री शिक्षणाचे आद्यजनक महात्मा फुले हेच आहे. जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. संलग्न संस्था शहरासह जिल्ह्यात अनेक उल्लेखनीय कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर यांनी केले. आभार अ‍ॅड. अनिता दिघे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद वाघमारे, नयना बनकर, सिमोन बनकर, गौतम सातपुते, मंदा सुपेकर, हिरामन जाधव आदींनी परिश्रम घेतले.