सौरभ चौरे मृत्यूप्रकरणी न्याय मिळण्यासाठी आरपीआयचे उपोषण

शहरातील लोखंडी कमानीवर जाहिरात लावताना युवकाला वीजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधीत जाहिरात ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या उपोषणात रिपाईचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, कार्याध्यक्ष दानिश शेख, आजिम खान, संदीप वाघचौरे, संतोष पाडळे, अभिजीत भगत, गणेश पोटे, बिरजू जाधव, शुभम धुमाळ आदींसह युवक सहभागी झाले होते.
शहरात सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात असलेल्या लोखंडी कमानीवर जाहिरात (फ्लेक्स) लावताना सौरभ चौरे (वय 22 वर्षे) याला कमानी जवळ असलेल्या विद्युत वाहक तारांचा स्पर्श होऊन वीजेचा धक्का बसला. यामध्ये तो खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला. महापालिकेने पुणे येथील एका संस्थेला दहा वर्षाच्या करारावर शहरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक फलक असलेल्या कमानीवर जाहिरात करण्यासंबंधी बीओटी तत्त्वावर ठेका दिला आहे. या प्रकरणात युवकाच्या मृत्यूस संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन जबाबदार आहे. लोखंडी कमानीच्या शेजारी विद्युत तारा असताना कमानीला परवानगी कशी देण्यात आली. या हलगर्जीपणामुळे एका युवकाला जीव गमवावा लागला आहे.   महापालिका व ठेकेदार या प्रकरणातून आपले अंग काढून घेत आहे. मयत युवकाच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. मयत युवकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.