स्वयंघोषित धर्मगुरुचे चर्चमधील अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण

भाविकांना प्रार्थनेसाठी चर्च खुले करुन देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुन्हा चर्च मध्ये घुसून अतिक्रमण करणार्‍या स्वयंघोषित धर्मगुरुला हटविण्याच्या मागणीसाठी  पाचेगाव (ता. नेवासा) येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर ख्रिश्‍चन मंडळी व ग्रामस्थांनी उपोषण केले. यावेळी कडूबाई देठे, चिलिया गोरक्ष तुवर, शालिनी देठे, बाबासाहेब देठे, सिमोन देठे, विशाल देठे, सरसाबाई देठे, अनिल देठे, शितल देठे आदी उपोषणात सहभागी झाले होते.
पाचेगाव (ता. नेवासा) येथे एक जुना सार्वजनिक चर्च आहे. ही जागा ग्रामपंचायत पाचेगावच्या नावाने आहे. गावातील एका स्वयंघोषित धर्मगुरुने आपल्या कुटुंबासमवेत त्या चर्चच्या जागेत अतिक्रमण केले आहे. यापूर्वी देखील सदर व्यक्तीला उपोषण केल्यानंतर चर्चमधून पोलीस प्रशासनाने बाहेर काढले होते. मात्र पुन्हा त्या व्यक्तीने चर्च मध्ये घुसून अतिक्रमण केले असून, तो प्रार्थनेमध्ये अडकाठी आनत आहे. सदर व्यक्तीला विरोध केल्यास तो खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. सदर व्यक्तीची कौटुंबिक पार्श्‍वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्याच्यावर अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
चर्चमध्ये येणार्‍या भाविकांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणार्‍या सदर व्यक्तीला चर्चच्या बाहेर काढून भाविकांना चर्च प्रार्थनेसाठी खुले करुन देण्याची मागणी ख्रिश्‍चन मंडळी व ग्रामस्थांनी केली आहे.