अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव

मुख्यमंत्र्याची घोषणा ; बारामती मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचे नाव

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी चौंडीत केली. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 298 वा जयंती सोहळा चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत साजरा झाला. व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील,आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अण्णा डांगे, विकास महात्मे आदींची उपस्थिती होती. सोहळ्यात प्रारंभी राम शिंदे व पडळकर यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे चौंडीत स्वतंत्र कार्यक्रम घेणार होते. मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने त्यांनी आपला कार्यक्रम रद्द करत मंगळवारी रात्री सप्त नद्यांच्या जलाने अहिल्यादेवींच्या पुतळ्याला जलाभिषेक केला. फटाक्यांची आतषबाजी करत रोषणाई केली. बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरने अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.