जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आ. शिवाजी कर्डिले यांची निवड

अहमदनगर : मेट्रो न्यूज   

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली आहे.अध्यक्षपदाची ही निवड मतदानाद्वारे करण्यात आली. या अगोदर अ‍ॅड. उदय शेळके हे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदी  होते. पण दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती.

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे शिवाजीराव कर्डिले आणि महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घुले यांच्यामध्ये  ही लढत होती.अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी भाजपतर्फे शिवाजीराव कर्डिले यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता.त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली होती.  निवडणूक अटीतटीची होणार, असे चित्र निर्माण झाले होते. या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांना दहा मते मिळाली तर  चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली आणि एक मत बाद झाले. कर्डिले यांनी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव केला.

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यामुळे  शिवाजीराव कर्डिले यांचा  सत्कार करून विजयाचा आनंद साजरा  करण्यात आला.