फुले दांम्पत्यांनी स्त्री पुरुष समानता व सामाजिक समता प्रस्थापित केली -न्यायाधीश नेत्राजी कंक

स्त्री शिक्षणाच्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या मदतीने स्त्री पुरुष समानता व सामाजिक समता प्रस्थापित केली. मात्र आजही स्त्री पुरुष समानतेसाठी संघर्ष करावा लागत आहे. सुसंस्कृत सुशिक्षित महिलांनी नाही तर पुरुषांनी व्हावे. आपला आचार सांभाळून दोघांनी स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा व स्त्री, पुरुष समानता मान्य करावी, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांनी केले.
न्यायाधार संस्था, अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालय व अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कौटुंबिक न्यायालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना न्यायाधीश कंक बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल सरोदे, कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपाध्यक्ष अ‍ॅड. संदीप वांढेकर, सचिव अ‍ॅड. स्वाती नगरकर, महिला सचिव अ‍ॅड. आरती गर्जे-पाटील, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. निर्मला चौधरी, समुपदेशक सुषमा बिडवे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे न्यायाधीश कंक यांनी पती-पत्नीचे पटत नाही…. या कवितेच्या माध्यमातून लग्नानंतर पती-पत्नीचे भांडण, उध्वस्त होणारे संसार व लेकरांची फरपटची दाहकता विशद केली. तर सावित्रीबाई फुले व महात्मा फुले या दांपत्यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. प्रास्ताविकात न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा निर्मला चौधरी यांनी आजची स्त्री ही सक्षम असून, तिला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवून समाजाचा उध्दार केला. आजच्या महिलांनी सुखी संसार करुन आपल्या कुटुंबाचा उध्दार करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांची आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी अ‍ॅड. करूणा शिंदे, अ‍ॅड. दिक्षा बनसोडे, अ‍ॅड. शितल बेद्रे, अ‍ॅड. स्नेहल बनकर, अ‍ॅड. अस्मिता उदावंत, महिला समुपदेशक शकुंतला लोखंडे, विजया जाधव, अ‍ॅड. अनिता दिघे, बेबी बोर्डे, सुनिता गोर्डे, आशा गोंधळे आदींसह महिला वकिल कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. पल्लवी पालेकर-होनराव यांनी केले. आभार अ‍ॅड. शितल बेद्रे यांनी मानले.