बँक कधी सुरू होणार ते सांगू नका, आमचे पैसे परत करा
आमच्या बँकेत ठेवलेल्या ठेवी तसेच बँक खाते अडकलेले पैसे परत करा, अशी मागणी करत नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी स्व.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानासह पोलिस अधीक्षक कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान घोटाळ्यातील दोषींवर ठेवेदार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी ठेवेदारांना दिले. नगर अर्बन बँकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी बँक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली स्व.गांधी यांच्या घरावर आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर आसूड मोर्चा काढला. यावेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी ठेवीदारांना ठेवी परत मिळावेत आणि बँक पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिझर्व बँकेने परवाना रद्द केला आहे त्यामुळे अडचण झाली अशी भूमिका मांडली त्यावर ठेवीदार चांगलेच आक्रमक झाले.आम्हाला आमच्या ठेवी आणि खात्यात अडकलेले पैसे पाहिजेत, बँक सुरू कधी होणार हे सांगू नका. आम्ही दोन वर्ष तुमचे ऐकले, आता आम्ही किती दिवस थांबायचे? असं सवाल करत ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली.यावेळी ठेवीदारांनी गांधी यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर जाऊन धडकला. बँक बचाव समितीच्या शिष्टमंडळाने आपण पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन भूमिका मांडली. बँक घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यांचे फॉरेनसिक ऑडिट सुरू आहे .त्याचा अहवाल अद्यापही मिळाला नाही. पोलिसांनी तत्काळ 200 संचालक हे त्यांचे साथीदार आणि कर्जदारांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खैरे यांनी फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या संस्थेची फोनवरून संपर्क साधला. त्यांनी आज गुरुवारी ऑडिट रिपोर्ट देणार असल्याचे सांगितले. हा अहवाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच ठेविदार संरक्षण कायद्यानुसार तत्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही खैरे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांना दिल्या आहेत.