भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन प्रश्‍नी गृहमंत्रींना निवेदन

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे मोठ्या जागेत स्थलांतर करुन, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांचे संख्याबळ वाढविण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी दिले.
नगरमध्ये शासकीय विश्रामगृह येथे गृहमंत्री वळसे-पाटील आले असता त्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ आदी उपस्थित होते.
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे भिंगार शहरातील रस्त्याच्या मध्यभागी आहे. जागा कमी असल्याने दैनंदिन काम करण्यास पोलीस कर्मचार्‍यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन मोठी उपनगरे, दहा ग्रामपंचायती, लष्कराचे मुख्य तीन विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय व निवासस्थान तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्ग आणि धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा समावेश आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये भुरट्या चोर्‍या व इतर गुन्हेगारांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे गृह खाते बदनाम होत आहे. याबाबत वास्तुस्थिती पाहिली असता, त्याला पोलिसांचे अपुरे संख्याबळ कारणीभूत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला पोलीसांचे संख्याबळ वाढवावे व पोलीसांना व्यवस्थित काम करता येण्यासाठी पोलीस स्टेशनचे मोठ्या जागेत स्थलांतर करण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.