मिजगर जमातच्या विश्‍वस्तांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या आरोपींना अटक करा

रिपाईची मागणी

नागोरी मुस्लिम मिजगर जमात ट्रस्टच्या जागेच्या वादातून शहरात ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर झालेल्या खुनी हल्ल्यातील आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी रिपाईचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष अजीम खान, विजय शिरसाठ, जावेद सय्यद, विशाल भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
21 जानेवारी रोजी शहरातील मंगलगेट परिसरात इक्राम तांबटकर, इम्रान शेख, युनूस तांबटकर या सामाजिक कार्यकर्त्यांवर काही समाजकंटकांनी जागेच्या वादातून जीवघेणा हल्ला केला. हल्ला करणार्‍यांकडे धारदार शस्त्र, लोखंडी रॉड व दांडगे असे जीवघेणे साहित्य होते. सुमारे पंधरा ते सोळा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला होता. त्या भागातील काही नागरिकांनी मध्यस्थी केल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेतील आरोपींवर तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. सदर घटना ही नगर शहराला गालबोट लावणारी आहे. यामधील आरोपींना अद्याप अटक झालेली नसून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असतानादेखील आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
यामधील आरोपी मोकाट असल्याने हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आरोपी   इतर मार्गाने वेगवेगळे निरोप पाठवून गुन्हा मागे घेण्यासाठी दहशत निर्माण करीत असून, अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी रिपाईने केली आहे. आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.