विनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला

नगर – रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे याचा विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळला.

रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार झाला होता. फरार असतानाच त्याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी बोठे सध्या पारनेर येथे न्यायालयीन कोठडीत आहे. जरे यांच्या हत्येनंतर आरोपी बोठे फरार असताना त्याने लपण्यासाठी कुख्यात गुन्हेगार लपण्यासाठी हैद्राबाद येथील प्रसिद्ध असलेल्या बिलालनगर परिसराचा आधार घेतला होता. जरे यांच्या हत्येनंतर 102 दिवसांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

कोतवाली पोलिसांंनी आरोपी बोठेला खुनाच्या गुन्ह्यातून विनयभंगाच्या गुन्ह्यात तपासासाठी वर्ग करून घेतले होते. तपासानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बोठेने विनयभंगाच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. हा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सरकारी   पक्षाच्यावतीने अ‍ॅड. एस. के. पाटील व फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी कामकाज पाहिले. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. महेश तवले यांनी काम पाहिले.